गौताळा घाटात मजुरांच्या टेंपोचा अपघात; १३ कामगार जखमी

Foto
कन्नड, (प्रतिनिधी) : पुणे बारामती साखर कारखान्याचा हंगाम संपवून परतणाऱ्या ऊसतोड मजुरांच्या आयशर टेंपोचा रविवारी (ता. २९) सकाळी साडेनऊला गौताळा घाटात अपघात झाला. 

घाटातील म्हसोबा मंदिराजवळील अवघड वळणावर टेंपोचे ब्रेक निकामी झाल्याने चालकाचे नियंत्रण सुटले, वाहन थेट दरीत कोसळले. सोयगाव तालुक्यातील दस्तापूर येथील १३ मजूर जखमी झाले आहेत. त्यापैकी ७ जणांची प्रकृती गंभीर आहे. सोयगाव येथील मुकादम सुखदेव पगारे यांच्या टोळीतील मजूर चार महिन्यांपासून बारामती परिसरात ऊसतोडीसाठी गेले होते. 

काम संपवून सर्वजण टेंपोने (क्र. एमएच २१ बीएच ०४४२) घरी परतत असताना काळजाचा थरकाप उडवणारा हा अपघात घडला. अपघाताचा मोठा आवाज ऐकताच सायगव्हाण आणि भिलदरी तांडा येथील नागरिकांनी मदतीसाठी धाव घेतली. गावकऱ्यांनी रुग्णवाहिकेची वाट न पाहता, स्वतःच्या वाहनांतून जखमींना बाहेर काढून ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. 

ग्रामीण रुग्णालयात डॉ. रुक्सार खान यांनी प्राथमिक उपचार केले. वंदना अंभोरे, रुक्सना तडवी, दिव्या पगारे, सोमीबाई तडवी, रंजना पगारे, मनीषा वाघ आणि ममता वाघ या सात जणांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना तातडीने छत्रपती संभाजीनगर घाटी रुग्णालयात हलवले. आशाबाई पगारे, कोमल पगारे, ऋतिक पगारे, महेश माने, प्रवीण वाघ आणि सलीम तडवी या ६ जणांना प्राथमिक उपचारानंतर सुटी दिली. घटनेची नोंद कन्नड ग्रामीण पोलिसांत केली असून, जमादार रवींद्र ठाकूर व प्रदीप पवार अधिक तपास करत आहेत.